भोसरी: वारंवार पाठलाग करुन लैंगिक छळ केल्याने एका १२ वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलीच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीतून हा सर्व प्रकार उघडकीस आला असून भोसरी पोलिसांनी या संधर्भात दोन इसमांना अटक केली आहे. क्षितीज लक्ष्मण पराड (वय २०, रा. भोसरी), तेजस पांडुरंग पठारे (वय १९, रा. चर्होली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार भोसरीयेथील महादेव कॉलनीत ६ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चहाची टपरी आहे. त्यांच्या मुलीने ६ जून रोजी राहत्या घरी बेडरूम मध्ये दोरीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी पाहिलेले सी सी टीव्ही फुटेज तसेच मुलीच्या खिशामध्ये मोबाईल नंबर मिळाला. या मोबाईल नंबरवरुन क्षितीज पराड व तेजस पठारे यांनी फिर्यादीच्या मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा लैंगिक छळ केला, हे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या मुलीने या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असले असे निष्पन्न झाले. भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खाडे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.