पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात असल्याचे निदर्शनास येत आहे.देशात नक्की लोकशाही की हुकूमशाही असे प्रश्न संतप्त पत्रकारांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
जळगावचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे.जळगावमधील बालिकेवर अत्याचार आणि खून झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांचे फोन वरून सांत्वन केले होते. याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करत धारेवर धरले होते.
स्थानिक आमदार किशोर पाटील यांना ही टीका सहन न झाल्याने त्यांनी संदीप महाजन यांना फोन वरून शिवीगाळ केली होती.त्या संबंधित ऑडियो क्लिप व्हायरल झाली असून स्थानिक पत्रकारांसमोर ‘होय मीच त्या पत्रकाराला मारहाण केली आहे’ असा आमदार किशोर पाटील यांनी खुलासा केला आहे.
त्यानंतर आता पत्रकार संदीप महाजन यांच्यावर त्यांच्या स्वातंत्र्य सैनिक वडिलांचे नाव असलेल्या चौकात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी हा हल्ला आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून झाला असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यास आमदार किशोर पाटील आणि त्यांचे समर्थक जबाबदार असतील असे म्हटले आहे.
आता लोकशाहीत फक्त हुकूमशाहीच चालणार का ? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला समाजात एक वेगळे स्थान आहे. सत्य जगासमोर आणण्याचे काम पत्रकार हे करत असतात. अशाच लोकशाहीत सत्य समोर आणणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. नक्की देशात हुकूमशाही आहे की लोकशाही असे प्रश्न पत्रकारांकडून विचारले जात आहेत.












