लोकसभा निवडणुकांची मतमोजणी ४ जून रोजी असणार आहे. दरम्यान विविध पक्ष नेत्यांकडून जिंकून येणाऱ्या जागेबाबाबतचे दावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी यांचा ज्याप्रमाणे २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकात जो प्रभाव दिसला तसा प्रभाव २०२४ च्या निवडणुकीत दिसला नाही असे राजकीय अभ्यासकांनी म्हंटले आहे.
इंडिया आघाडी ३०० हुन अधिक जागा जिंकेल असा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी विश्वास व्यक्त केला आहे. पटोले म्हणाले, “गेल्या दहा वर्षांमध्ये जर आपण बघितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये जनतेचा खूप रोष आहे.
दहा वर्षांमध्ये देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. देशाचे संविधान सुरक्षित नाही. देशाचे प्रधानमंत्री सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खोटं बोलतात. स्वातंत्र्यानंतरचे दुसरे महायुद्ध लोकशाहीच्या माध्यमातून सुरू आहे. आता ही निवडणूक खरी जनतेनेच हातात घेतलेली आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.
“निवडणुकीच्या काळामध्ये एकीकडे सरकार हे सर्वसामान्य मतदार राजाला मतदान मागायला निघाले. पण दुसरीकडे महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कालावधीत आपले जीवन संपवले. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही. अशी परिस्थिती सध्या राज्यातील शेतकऱ्यावर निर्माण झालेली आहे. मात्र सरकारला या परिस्थितीशी काहीही घेणं देणं नाही, असे पटोले म्हणाले.
“राज्यात ४० जागांच्या वर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे तर देशात इंडिया आघाडी ३०० हुन अधिक जागा जिंकेल” असा दावा पटोले यांनी केला आहे.