स्वीप या मतदार जनजागृतीच्या संकल्पनेतून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत मतदार जनजागृती – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते
लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हा सर्वात महत्त्वाचा अधिकार राज्यघटनेने 18 वर्षावरील भारतीय नागरिकाला दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मताधिकार्याचा वापर करावा. भारत निवडणूक आयोगाने नागरिकांकरिता सीव्हीजीआयएल , मतदार नोंदणी करता व्होटर हेल्पलाइन, दिव्यांगांसाठी सक्षम, उमेदवारांची माहिती करता केवायसी असे विविध मोबाईल ॲप्लिकेशन आता नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशाने स्वीप या मतदार जनजागृतीच्या संकल्पनेतून समाजाच्या सर्व घटकांपर्यंत मतदार जनजागृती करण्यात आली आहे. स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करीत, महाविद्यालयातील युवकांनी यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील, पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली असेल असा विश्वास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी व्यक्त केला.शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती करिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व महिला बचत गटांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ माननीय दादासाहेब गीते यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. पंडित नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवी खंदारे, निवडणूक नायब तहसीलदार सायली धस, स्वीप समितीचे राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक, दीपक कदम, सागर काशीद, डॉ. प्रभाकर वराडे, डॉ. नंदकुमार बोराडे, दिव्यांग प्रतिनिधी महेश मिस्त्री, वैशाली धामणस्कर, स्वप्निल शिरसागर, अभिषेक घरत, श्रीकृष्ण सुतार, सुमित पाटील, अभिरामी पिल्ले, सुमित पाटील व निकिता लाहोटी यांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिक व आयएलएस विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे आयोजन केले होते. माझे मत माझा अधिकार या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुणे मनपाचे सेवानिवृत्त सेवक महादेव जाधव यांनी गीत गायनाच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली. मॉर्डन व सीओईपी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन स्वीप समन्वय समिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्ताविक समाज विकास विभागाचे दीपक कदम यांनी केले. सूत्रसंचालन निकिता लाहोटी या विद्यार्थिनीने केले.