बारामती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. अशातच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे बारामती लोकसभेचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकांवर राज ठकरेंचा फोटो झळकताना दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीकरीता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांचा देखील फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या फोटोनंतर रामदास आठवले, रासपाचे महादेव जानकर यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रचार पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. साधारण रोजच्या दौऱ्याचं प्रचार पत्रक जाहीर करण्यात येतं. त्यामुळे सुनेत्रा परवारांचा दौरा कोणत्या गावात किती वाजता आहे. याची माहिती देणारं हे प्रचार पत्रक आहे. या प्रचार पत्रकात आता राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे.