पुणे : सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पोलीस केवळ आपले कर्तव्य नाही तर एक माणूस म्हणून देखील ते आपली जबाबदारी निभावताना दिसतात. अशीच एक उल्लेखनीय कामगिरी लोणीकंद पोलिसांनी केली आहे. येथील पोलिसांनी गुरु पौर्णिमेचे अवचित्य साधून वाघोली येथील विष्णू शेकोजी सातव शाळेतील एका विद्यार्थ्याला शाळेचे दोन गणवेश व पाच हजार रुपये रोख स्वरूपात मदत केली आहे.
सातव शाळेत व्यसन मुक्ती या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थी अंचित याचे परखड असे भाषण ऐकून पोलीस अधिकारी प्रभावित झाले होते. शाळेतील या हुशार विद्यार्थ्याची आर्थिक परस्थिती बेताची असल्याचे समजताच पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला मदत केली. यावेळी विद्यार्थ्याने आभार मानताना ” या मदतीची मी भविष्यात मोठा अधिकारी होऊन परतफेड करिन ” असे पोलिसांना वाचन दिले आहे.
रितेश काळे, पोलीस अंमलदार यांनी लोकतंत्रशी संवाद साधताना सांगितले कि “ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला पाहिलं तेव्हा स्वतःचीच आठवण झाली. जस आपण शाळेत असताना होतो, अगदी तशीच या मुलाची या काळात सुद्धा परिस्थिती आहे”.
शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्या वेळी या विद्यार्थ्याचे भाषण ऐकल्यावर असं कुठंतरी वाटलं हा विद्यार्थी खूप हुशार, कष्टाळू आहे. पण त्याची घरची आर्थिक परस्थिती चांगली नाही असं समजताच वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ तैगुडे यांच्याशी बोलून त्या विद्यार्थ्याला आम्ही मदत केली,पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे यांनी सांगितले.
हि उल्लेखनीय कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ तैगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार रितेश काळे यांच्यासह पोलीस ठाण्यातील संपूर्ण टीमने केली आहे.
लोणीकंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : शालेय विद्यार्थ्याला केली मदत












