जुन्या प्रथांना नव्या दृष्टीकोनातून बघण्याची गरज
पती आणि पत्नी ही संसाररथाची दोन चाकं. या चाकांच्या भक्कम आधारावरच संसाररूपी रथाचा गाडा अविरत सुरू असतो. पती-पत्नीचं नातं अनोखं असतं. या नात्यात जिव्हाळा असतो, आपुलकी असते तसंच रुसवे-फुगवेही असतात. हिंदू धर्मात सणउत्सव, व्रतवैकल्यांची रेलचेल आहे. या व्रतांमागे काही प्रयोजनं असतात. काही व्रतांमुळे, प्रथांमुळे पती-पत्नीच्या नात्यांचे बंध अधिक घट्ट होत असतात. वटपौर्णिमा हे सुद्धा असंच एक व्रत. खरं तर, वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी मोठा सणच जणू! पुराणकाळात सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले. तेही साक्षात मृत्यूची देवता असणाऱ्या यमराजाकडून. पतीचा निपचित पडलेला देह बघून ही सावित्री डगमगली नाही. तिने हातपाय गाळले नाहीत. ती यमराजाला सामोरी गेली, प्रसंगावधान राखलं. यमराजाच्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरं दिली आणि आपल्या जिद्दीच्या बळावर पतीचे प्राण परत आणले. या सगळ्या घटनेचं साक्षीदार होतं ते वडाचं झाड. म्हणूनच वटपौर्णिमेला वडाची पूजा केली जाते.
वड हा अत्यंत उपयुक्त असा वृक्ष. वातावरणात प्राणवायू सोडण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम तो करत असतो. इतकंच नाही, तर तो औषधीही असतो. विस्तीर्ण पसरलेला वड सावली देतो. निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यात वडाची महत्त्वाची भूमिका असते. जुन्या काळातल्या चूल आणि मूल या चाकोरीत अडकलेल्या महिलांना निसर्गाच्या जवळ नेण्याचं, या सणाचं एक उद्दिष्ट असावं.मंगळागौरीप्रमाणेच वटपौर्णिमा हा सुद्धा महिलांचा हक्काचा सण. यानिमित्ताने महिला नटून-थटून घराबाहेर पडत. मैत्रिणींसोबत गप्पा मारून मन मोकळं करत. काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवत. मात्र आजच्या आधुनिक काळात अनेक महिलांना वटपौर्णिमेचं व्रत अंगीकारणं शक्य होत नाही. काळानुरूप अनेक प्रथा बदलल्या. वटपौर्णिमाही याला अपवाद नाही. फक्त एक दिवस वडाची पूजा करून पतीच्या दिर्घायुष्याची कामना करण्यापेक्षा त्या आयुष्यभरासाठी त्याचा आधारवड बनतात. पतीला त्याच्या पडत्या काळात खंबीर साथ देतात. पतीचे प्राण परत आणण्यासाठी पुराणकाळातली सावित्री खंबीर झाली होती. आजच्या आधुनिक काळातल्या महिला पतीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात. आजची सावित्री अनेक अर्थांनी बदलली आहे. ती नवऱ्यासाठी प्राण पणाला लावते. त्याचा आत्मविश्वास वाढवते. खऱ्या अर्थाने त्याची सहधर्मचारिणी, अर्धांगिनी बनते. कधी नवरा नोकरी गेल्याची दुखद बातमी घेऊन घरी आला. तर तो क्षण पायाखालची जमीन हलवणारा असतो. मात्र त्यात पण ती त्याला म्हणते की ‘आज आपण बाहेर जेवायला जाऊ या. तेव्हा चांगले कपडे घाल, चेहरा हसरा ठेव. हीच तर आयुष्याची खरी सुरुवात आहे. तू शिकलेला आहेस. आपण व्यवसाय सुरू करू. या व्यवसायात तू कोणाचा नोकर नाहीस, तर मालक असशील. भागीदार म्हणून मला स्वीकारशील का?` तिचे हे आश्वासक आणि आधार देणारे शब्द त्याच्यासाठी नवसंजीवनीच ठरतात, अशा पती पत्नींचा संसार बहुअंगानं फुलला आहे. अशा वेळी ती वडाची पूजा करते की, नाही हा प्रश्न निरर्थक ठरतो. ती उपवास करते की, नाही या प्रश्नाला काही अर्थ नसतो. इथे उरते ती फक्त सद्भावना. सध्याचे सत्यवानही जागरूक आहेत. त्यांना पत्नीच्या कष्टाची कदर आहे. अनेकांना घराबरोबरच नोकरी करणाऱ्या बायकोचा अभिमान वाटतो. इतकंच नाही, तर हे सत्यवान आपल्या सावित्रीला शक्य ती सगळी मदत करताना दिसतात. घरातली कामं करताना त्यांना कोणताही कमीपणा जाणवत नाही. उलट, अनेक घरांमध्ये कामांची समसमान वाटणी झाल्याचं सुखद चित्र पाहायला मिळतं. शेवटी सावित्री झटते कशासाठी? संसारासाठी सत्यवान सावित्रीच्या पुराणकथेमध्ये सावित्रीचा संघर्ष दिसतो. पण प्राण परतल्यावर सत्यवानाने सावित्रीचा सन्मान केला का, याचं उत्तर मिळत नाही. हे उत्तर देण्याची जबाबदारी आजच्या सत्यवानांवर आहे. आपल्या पत्नीला कुटुंबात आणि समाजात मान आणि आदर मिळावा यासाठी त्यांनीही जागरूक असायला हवं. पत्नीची पिडा, वेदना ओळखायला हवी. घरादाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या या अन्नपूर्णेलाही विश्रांतीची गरज आहे, हे जाणून घ्यायला हवं. रविवारी सकाळी ‘आज संडे स्पेशल काय?` असा प्रश्न विचारण्यापेक्षा ‘आज संडे स्पेशल तुझ्यासाठी आहे,` असं म्हणायला हवं. एखादं वेळी या अन्नपूर्णेच्या हातातही भरलेलं ताट द्यायला हवं. व्रताची फलश्रृती एकांगी नको. केलेल्या व्रताचं फळ तिलाही मिळालं, तर अधिक चांगलं नाही का? पती हयात असतानाच नाही, तर त्याच्या निधनानंतरही त्याचं कर्तव्य बजावणाऱ्या महिला आधुनिक काळातल्या सावित्रीच आहेत. शत्रूशी लढताना धारातीर्थी पडलेल्या पतीच्या जागी लष्करात जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक, मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे, मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी महाडिक अशी अनेक उदाहरणं देता येतील. या महिला पतीचे प्राण परत आणू शकत नसल्या तरी त्याचं अपूर्ण राहिलेलं कर्तव्य बजावताना त्या कोणतीही कसर सोडत नाहीत. या महिला आधुनिक काळातल्या सावित्रीच नाही का? घरोघरी अनेक सावित्री आजन्म हे व्रत अंगीकारताना दिसत आहेत. नवऱ्याशी पटत नसलं तरी संसाराचा डोलारा सांभाळत खंबीरपणे उभ्या आहेत. कारण त्यांना संसाररूपी रोपटं वृक्षामध्ये परावर्तीत करायचं आहे. संसाराचा वटवृक्ष झाला तरच चिमण्या- पाखरांना हक्काचा आधार मिळू शकतो. घरोघरच्या सावित्री याच जाणिवेने संसाराला टेकू देऊन खंबीरपणे उभ्या आहेत. देशातच नव्हे, तर विदेशातही त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान होताना दिसतो. मध्यंतरी पडलेल्या एका चाचणीमध्ये भारतीय गृहिणींना गृहकर्तव्यदक्षतेमध्ये खणखणीत गुण मिळाले आहेत. जगभर पार पडलेल्या या चाचणीमध्ये भारतीय गृहिणींनी मिळवलेले हे सर्वोत्कृष्ट गुण आहेत. जागतिक पातळीवर भारतीय गृहिणींचा उल्लेख ‘अष्टभूजा` म्हणून केला गेला आहे. खरोखरच त्या आठ हातांचं बळ घेऊन कामं ओढताना दिसत आहेत. अशा या सावित्रींचा सन्मान व्हायला हवा आणि त्यांच्या इच्छित कामनांची पूर्तता व्हावी, हीच सदिच्छा यंदाच्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्त करायला हवी.
मात्र केवळ सदिच्छा देऊन संसाररूपी गाढा समर्थपणे ओढला जाणार नाही त्यासाठी दोन्ही चाके समसमान पद्धतीने चालली पाहिजेत. ही जबाबदारी कोणा एकाची नाही किंवा एका घरापुरती आणि संसारापुरती मर्यादीत नाही. या अशा आदर्शातूनच आदर्श समाजाची गुढ उभी राहत असते. त्यामुळे जेवढी जबाबदारी स्त्रीची तेवढीच किंबहूना अधिक जबाबदारी पुरूषांची आहे. सद्याचे हे कलयुग भुतकाळाच्या घटनांवरच अवलंबून आहे, मात्र त्या घटना किंवा अख्यायिकांना नव्याने नव्या जगाचा, कलियुगाचा आकार देता आला पाहिजे. वट सावित्रीच्या प्रथेप्र्रती व्यक्त होताना तिच्यात कलयुगाचे आयाम यायला हवेत तरच तिचा स्विकार केला जाईल आणि ती टिकून राहील. आजकाल पारंपारिक सण हे ग्रामीण भागातच मर्यादित होऊ लागले आहेत. त्यांना नव्या आणि आधुनिक विचारांच्या मनात रूजवायचे असेल तर त्याचे महत्व नव्या संदर्भाने पटवून द्यावे लागेल. सण साजरे करण्यामागची भूमिका, त्यामागे असलेला भाव, नात्यातील गोडवा आणि त्याची आजची गरज याबाबी प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडाव्या लागणार आहेत.
वटसावित्री म्हणजे स्त्रियांनी आर्जव करण्याचा किंवा त्या पुरूषांवर अवलंबून आहेत, असा भाव व्यक्त करणारा सण असल्याची भावना अनेकांच्या मनात येऊ शकते. पुर्वीच्या काळी असा समज सर्रासपणे होता मात्र आता त्याला नव्या आणि कलयुगाच्या चष्म्यातून पहावे लागणार आहे. तो साजरा करण्यामागची भुमिका चिकित्सकपणे मांडावी लागेल. अलिकडे ज्या सामाजिक समस्या उद्भवल्या आहेत. जशा घटस्फोट, अलिप्त राहणे, एकत्र राहूनही अबोला, एकमेंकाबद्दल आकस, अविश्वास दाखविणे, अशा अनेक समस्यांनी संसाररूपी वेल करपू लागली आहे. या पवित्र नात्यातील गोडवा आटू लागला आहे. याचा परिणाम थेट सामाजिकतेवर होत आहे. याने विवाह प्रथा मोडकळीस येऊ लागल्या असून, ते रोखण्यासाठी आज त्याचे काय महत्व आहे हे पटवून द्यायला हवे.












