पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातीळ आरोपीस अटक न करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणात शहर पोलीस दलाचे आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या दंगा काबु पथकात कार्यरत होते. श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस निरीक्षक असताना एका व्यक्तीला फसवणुकीच्या गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी बहिरट यांच्या सांगण्यावरुन सहायक फौजदार क्षीरसागर याने सादर इसमाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी त्याची पडताळणी केली. त्यात क्षीरसागर याने तडजोडीअंती २ लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली होती. यावेळी श्रीहरी बहिरट यांना तक्रारदार याचा संशय आल्याने त्याच्याकडील व्हाईस रेकॉर्डर काढून घेतला होता. त्यानंतर सापळा कारवाई झाली नाही. मात्र, लाचेची मागणी झाली असल्याने क्षीरसागर याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सहभागाविषयी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तपास करत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने बहिरट व क्षीरसागर यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले असल्याची माहिती प्राप्त होत आहे.