मनसेतून बाहेर पडलेले आणि पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे चाचपणी केली, पण महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. यानंतर रवींद्र धंगेकर हे मराठा समाज आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासाठी मोरे हे लवकरच आंबेडकर-जरांगे यांची भेट घेणार असल्याचेही वृत्त आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उतरवण्याचा निर्णय झाला आहे, त्यानुसार मराठा समाजाच्या सर्वत्र बैठका सुरू आहेत. या संदर्भातील पुण्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीला इच्छूक उमेदवार वसंत मोरे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची उमेदवार यादी जाहीर करताना, मनोज जरांगे पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे. तसेच नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. वंचितने कोल्हापुरात शाहु छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्प्यातील वंचितच्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचे समर्थन आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यानंतर आता वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होऊ शकते, अशी शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडी उर्वरित उमेदवार ०२ एप्रिलला घोषित करणार आहे. तत्पूर्वी, वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जरांगे-आंबेडकर-शेंडगे यांच्या पाठिंब्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली तर पुण्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहू शकते. मात्र, सध्यातरी वसंत मोरे यांची उमेदवारीसाठी धावपळ सुरू आहे.