पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात दिवसाढवळ्या एका सोन्याच्या दुकानावर ६ ते ७ जणांनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि.१८) दुपारी बाराच्या सुमारास वानवडी येथील बी.जी.एस. ज्वेलर्स येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरी, जबरी चोरी, मारामारी, दरोड्याचे प्रमाण वाढत आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहमदवाडी रोडवरील वारकर मळा येथील पीजीएस ज्वेलर्सच्या दुकानात दुपारी बाराच्या सुमारास सात अनोळखी तरुण तोंडाला मास्क लावून आले. त्यांनी दुकानात असेलल्या व्यक्तीला मारहाण करुन दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानातील ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले. आरोपी दुचाकीवरुन आले होते. दरोडा टाकल्यानंतर ते दुचाकीवरुन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.