पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : पुणे परिसरात गाडीला ठोकर मारून मदत करण्याऐवजी आरोपी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चिखली पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
सागर रायबा चव्हाण ( वय ३१, रा .भागीरथी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर ) असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी एका अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दिनांक २२ रोजी फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून साई मंदिरासमोरून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या चार चाकी गाडीने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून गाडी चालवल्याने त्या गाडीने फिर्यादी यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमध्ये फिर्यादी यांच्या हात – पायास तसेच कमरेस दुखापत झाली आहे. गाड्यांची धडक झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना मदत करायचे सोडून तेथून पळून गेला आहे.
आरोपीवर भादवि कलम २७९,३३७, मोटार वाहन कायदा कलम १३२ ( १ ) क १७९,१८४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुदळे हे करीत आहेत.












