विक्रीकर अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्राद्वारे १६ कंपन्यांना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांचा कर परतावा मंजूर करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी एसीबीने विक्रीकर अधिकारी अमित गिरिधर लाळगे याच्यासह १६ कर दात्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहाय्यक विक्रीकर आयुक्त, G.S.T भवन, माझगाव, मुंबई यांनी तक्रार केली आहे. यावरुन विक्रीकर अधिकारी, वस्तू व सेवा कर विभाग, माझगाव मुंबई अमित गिरिधर लाळगे (वय- ४४) व १६ करदाते ट्रेडर्स संबंधित व्यक्तींवर कलम ७,१३(१)(अ) सह १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ सह भा.दं.वि. कलम १२०(ब), ४०३, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन वस्तू व सेवा विभागाचे अधिकारी तसेच विक्रीकर अधिकारी म्हणून कार्य़रत अमित लाळगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
लाळगेकडे घाटकोपर विभाग नोडल ११ चा पदभार असताना, ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. १६ करदात्यांनी त्यांच्या व्यवसायाचे बनावट व खोटे भाडेकरारपत्र सादर करुन जीएसटीएन क्रमांक प्राप्त केले. त्यानंतर या करदात्यांनी शासनाला कोणताही कर भरला नसताना एकूण १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपयांच्या कर परताव्यासाठी ३९ करपरतावे अर्ज सादर केले होते.
लाळगे याने या अर्जाबाबत कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच ते करदाते बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम मध्ये दिसत असतानाही अमित लाळगे याने हे करपरतावे अर्ज मंजूर केले. १६ जणांनी संगनमताने स्वत:सह कर दात्यांच्या फायद्यासाठी अपात्र परतावा मंजुर करुन १६ करदात्यांना १७५ कोटी ९३ लाख १२ हजार ६२२ रुपये वितरीत करुन शासनाची फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यानंतर एसीबीने गुन्हा दाखल केला असून त्या कंपन्यांबाबत अधिक तपास सुरु आहे. पुढील तपास एसीबी बृहन्मुंबईचे पोलीस निरीक्षक मानसिंग वचकल करीत आहेत.
१) मे. लिबर्टी ट्रेडर्स, २) मे. एस के फॅशन एक्सो, ३) मे. ट्रेडसेट एक्सपोर्ट अँड मार्केटिंग, ४) मे. टेक्नोटीप मार्क, ५) मे. आउटसोर्स ओप्टीमायझेशन, ६) लिंकपार्क इंफ्रा, ७) मे. बिल्डनेट एक्सपोर्ट अँड मार्केटिंग, ८) मे. फ्लोवेज मार्केटिंग, ९) मे. ईडन स्क्वेअर सोलुशन, १०) मे. श्री बालाजी ट्रेडर्स, ११) मे व्हर्चुअल ओव्हरसिस मार्केटिंग, १२) मे. इरिक फॅशन्स, १३)
मे. ग्लॅडस्टोन, १४) ओनेक्स इंटरप्राइजेस, १५) मे. डेलमुन इंटरप्राइजेस, १६) मे. ओनिक्स ट्रेडलिंक या करदात्यांनी शासनाची फसवणूक व आर्थिक हानी केली आहे.
ही कारवाई एसीबी मुंबई अपर पोलिस आयुक्त विजय पाटील, अपर पोलीस उप आयुक्त राजेन्द्र सांगळे, अपर पोलीस उप आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई एसीबीच्या पथकाने केली.