पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१३ : गेल्या काही दिवसांत मुलींवर होणाऱ्या हल्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रोड रोमिओ व टवाळखोर मुलांकडून घरी जात असताना मुलींना होणार त्रास रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून निर्भय विद्यार्थी अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने लेक्सीन शाळा येथे प्राचार्य व शिक्षकांची बैठक बुधवार दि.१२ रोजी घेण्यात आली होती.
प्रत्येक शाळा,महाविद्यालयात पोलीस दीदी व पोलीस काका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालयामधील उपस्थित प्राचार्य व शिक्षकांना पोलीस दीदी व पोलीस काका यांची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच उपस्थित प्राचार्यांना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे आवाहन केले आहे. शिक्षकांनी विद्यार्थिनींना होणाऱ्या त्रासाची माहिती पोलिसांपर्यंत पोहचवावी या विषयीचे महत्वाचे मुद्दे समजून सांगितले. शाळा भरताना व शाळा सुटताना गेटच्या बाहेर कुणी टवाळ खोर मुलं असल्यास त्वरित पोलिसांना कळवावे अशी विनंती देखील या वेळी करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमासाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,सहा.पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा.पोलीस उपायुक्त संजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे,लेक्सीन शाळेचे अंजु लुथा,अमोल लोखंडे व ७२ शाळा,महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.












