पुणे : जयपूर ते मुंबई असा विमानाने प्रवास करायचा. मुंबईत उतरल्यानंतर झुम कार ॲपवरुन कार भाड्याने घेऊन पुण्यात येयचे. त्यानंतर शहरातील मोठ्या मॉलमध्ये जेऊन ब्रॅडेड कपडे, शूज चोरुन निघून जायचे. मात्र, बंडगार्डन पोलिसांनी चोरी करुन पळून जाणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ब्रँडेड कंपनीच्या पॅन्ट, टी-शर्ट असा एकूण ४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांनी टोळीच्या मोरक्याला अटक केली.
गौरव कुमार रामकेश मीना (वय १९), बलराम हरभजन मीना (वय २९ दोघे रा. रा. ग्राम पोस्ट गणीपूर, तहसील शिक्राय, जिल्हा दौसा, राजस्थान), टोळी प्रमुख योगेश कुमार लक्ष्मी मीना (वय २५ रा. ग्राम सूरोड, तहसील सुरोड, जिल्हा करौली, राजस्थान), सोनू कुमार बिहारीलाल मीना (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भा.दं.वी. कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजता संगमवाडी येथील रिलायन्स फॅशन फॅक्टरी मॉल मधून आरोपींनी कपडे घेतले. दुकानातून बाहेर पडत असताना एक्झिट गेटवरील सिक्युरिटी अलार्म वाजल्याने आरोपी पळून जात होते. सिक्युरिटी गार्डनी पाठलाग करुन यातील दोघांना ताब्यात घेतले. या दुकानाच्या परिसरात उभ्या असलेल्या कारची झडती घेतली असता त्यांना ब्रॅन्डेड कंपनीचे कपडे, शूज, बेल्ट आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.
आरोपी जयपुर ते मुंबई असा विमानाने प्रवास करुन मुंबईत येत होते. मुंबईतून झुम कार अॅपद्वारे कार भाड्याने घेवून मोठ्या शहरातील मॉलमध्ये जाऊन ब्रॅन्डेड कपडे व शूज चोरी करायचे. कपडे ट्रायल करण्याच्या बहाण्याने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते. कपड्यांची चोरी करताना आरोपी कपड्यांवरील सिक्युरीटी व बारकोड टॅग तोडून टाकत होते.
अटक केलेल्या आरोपींच्या साथीदारांचा शोध घेत असताना पोलिसांनी टोळीचा मोरक्या योगेश मिना याला मोबाईल फोनच्या लोकेशनवरुन खडकी बाजार येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. तर सोनु मीना याला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. आरोपींकडून बंडगार्डन पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख १७ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली कार, कपडे, शूज जप्त केले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.