पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : एका रोगनिदान प्रयोगशाळेतील तज्ञ महिलेची 16 लाखांची फसवणूक विमा पॉलिसी सुरू करून देण्याच्या बहाण्याने करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोप शर्मा, रोहित मेहता यांच्यासह साथीदाराविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पन्नास वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या सेनापती बापट परिसरात रहात असून, त्या रोगनिदान करणाऱ्या प्रयोगशाळेतील तज्ञ आहेत. त्यांनी एका नामांकित कंपनीची विमा पॉलिसी काढली होती. पॉलिसी न भरल्याने पॉलिसी बंद पडली होती, बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यानी फिर्यादी महिलेच्या मोबाईल क्रमांक संपर्क साधला होता. वर्षभरात पॉलिसीतून चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. महिलेकडून वेळोवेळी १६ लाख ३८ हजार रुपये चोरट्यांनीऑनलाईन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण पुढील तपास करत आहेत.
विमा पॉलिसी सुरु करून देणाच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून पॅथॉलॉजिस्ट महिलेची लाखांची फसवणूक












