भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा वडील बनला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का हे त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये होते.
विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विशेष म्हणजे विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगू इच्छितो की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक छोटा पाहुणा आणि वामिकाचा लहान भाऊ आला आहे. या क्षणी आम्हाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना हवी आहे. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीची विनंती करतो, असे विराटने म्हटले आहे.
विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले असून अकाय शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे शरीरहीन. ज्या व्यक्तीला शरीर नाही किंवा जो शरीरविरहित आहे, त्याला अकाय म्हणतात. अकाय शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आकार किंवा स्वरूप नसलेले म्हणजेच निराकार.