पुणे | प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीत मानाची गणपती मंडळे बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक मार्गावर सोडण्याची परवानगी देण्यात येईल, असे पोलिसांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी स्पष्ट केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी ४ वाजता सहभागी होणार असल्याची घोषणा या पूर्वीच केली आहे. या पार्श्वभूमीवर मानाचे गणपती बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यावर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येईल का, असे पत्रकारांनी विचारले असता परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल म्हणाले, ‘मानाचे गणपती सायंकाळी चारच्या सुमारास बेलबाग चौकातून रवाना होतील.
त्यानंतर दगडूशेठ मंडळाला विसर्जन मिरवणुकीत प्रवेश देण्यात येईल. तर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बाबू गेनू मंडळ, श्री जिलब्या मारुती मंडळांनी जाहीर केलेल्या वेळेनुसार सायंकाळी ६ नंतर मिरवणुकीत त्यांना सहभागी होता येईल.”
मिरवणुकीत अंतर पडू नये, यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी गणेश मंडळांशी चर्चा झाली असून त्यांच्याकडूनही सहकार्य मिळत आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
ढोल ताशा पथकांवर मर्यादा
मिरवणुकीत दोन ढोल ताशा पथकांवर पोलिसांनी मर्यादा घातली आहे. एका पथकात ५० ढोल आणि १५ ताशांना परवानगी असेल. तसेच, गणेश मंडळांना बेलबाग चौक, सेवासदन चौक आणि टिळक चौकात वादनासाठी प्रत्येकी १० मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत आश्वासन दिल्याचे उपायुक्त गिल यांनी सांगितले.












