पिंपरी- शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच भविष्यात शरद पवारांसह जाणार का? या ज्या चर्चा सुरु असतात त्यावर थेट उत्तर देऊन टाकलं आहे. त्या त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या वडिलधाऱ्यांनीही असेच निर्णय घेतले आहेत. हे तुम्ही पाहिलं आहे. नदीचा काठी, रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहीत आहे. आपल्या वडिलधाऱ्यांनी सगळं सहन केला आहे. आम्हीही राजकारणात आलो. संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परिने केला.
मागच्या खेपेला मीच तुम्हाला अमोल कोल्हे यांना मतदान करा हे सांगायला आलो होतो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातून इथे आणलं, प्रवेश दिला, तिकिट दिलं. दिलीपराव आणि मी सीट निवडून आणायची जबाबदारी घेतली होती. मलाही वाटत होतं की वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंडा आहे. दोन वर्षांतच म्हणाले राजीनामा द्यायचा. मी कलावंत आहे वगैरे सांगत होते. मी त्यांना म्हटलं तसं करु नका. तर मला म्हणाले मी सेलिब्रिटी आहे. तरीही मी त्यांना म्हणालो की तुम्ही जाऊ नका. पण राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही. धर्मेंद्र, गोविंदा, सनी देओल यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांचा राजकारणाशी काय संबंध? असंही अजित पवार म्हणाले.
आता सरळ सरळ फाटी पडली आहे. आपण एका बाजूला ते (शरद पवार) एका बाजूला. त्यामुळे काहीजणं म्हणतात ही एकत्र येतील का रं? या चर्चांनी आमचे निम्मे गार होतील. दबकत बोलतात दादा काही होईल का? मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हे काही होणार नाही. मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका.