भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनसाठी इंग्लंडविरुद्धची धरमशाला कसोटी खास असणार आहे. ही कसोटी अश्विनची १००वी कसोटी असणार आहे. या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.
पत्रकार परिषदेत अश्विनने आपल्या १०० व्या कसोटीपर्यंतच्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. या पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला याबद्दल सांगितले. ‘२०१२ मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. इंग्लंडविरुद्धची ती कसोटी मालिका माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. ज्यामुळे मला चुका सुधारण्यास मदत झाली’, असं अश्विन म्हणाला. अश्विनने त्या मालिकेत ५२.४६ च्या सरासरीने तब्बल ७३७ धावा दिल्या.अॅलिस्टर कूक आणि पीटरसनच्या धुवांधार फलंदाजीमुळे त्या मालिकेत तीनवेळा त्याच्या गोलंदाजीवर शंभरहून अधिक धावा लुटण्यात आल्या. या कामगिरीमुळे अश्विनच्या कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होतं, इंग्लंडने भारताच्या भूमीवर ही मालिका २-१ ने जिंकली, जो इंग्लिश संघासाठी भारतातील १९८४-८५ नंतरचा पहिला मालिका विजय होता.
अश्विनने आपल्या १००व्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘२०१२ ची इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होती. मला कुठे सुधारणा करायची हे त्या मालिकेने मला शिकवले.’ पण नंतर अश्विनच्या फिरकीने मात्र भारतीय कसोटी संघात त्याचे अढळ स्थान निर्माण केले. अश्विनने याच मालिकेत ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.
१०० वा कसोटी सामन्याबद्दल अश्विन म्हणाला,’हा खूप खास प्रसंग आहे. १०० व्या कसोटी सामन्यापेक्षाही माझा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खास होता. मात्र, १०० वा कसोटी सामना असला तरी त्यासाठी माझ्या तयारीत कोणताही बदल झालेला नाही.आम्हाला धरमशाला कसोटी जिंकायची आहे.