पुणे प्रतिनिधी
पुणे दि. ०५ : शब्द-सुरांचा सुरेल साज, साथीदारांनी वादनातून भरलेले अनोखे रंग अन् मराठी-हिंदी चित्रपटातील ‘सीमा’पार आठवणींचा पट आज रसिकांसमोर उलगडला. निमित्त होते पूना गेस्ट होऊस स्नेह मंच आयोजित ‘या सुखांनो या’ सुमधूर मैफलीचे. ज्येष्ठ अभिनेत्री कै. सीमा देव यांना स्वरमय श्रद्धांजली वाहण्यासाठी पूना गेस्ट हाऊस येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी भावस्पर्शी आठवणींची सांगड घातली तर प्रि सद्ध गायिका मनिषा निश्चल आणि प्रणव कुलकर्णी यांनी आपल्या सुरेल आणि सुमधूर आवाजात मैफल खुलवत नेली. ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, पंडित वसंतराव गाडगीळ, बकुळ पंडित, शैला दातार, जयमाला इनामदार, आनंद सराफ, विनया देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पूना गेस्ट हाऊस आयोजित आणि ‘महेक’च्या मनिषा निश्चिल प्रस्तुत या मैफलीचे समन्वयक अजित कुमठेकर होते तर दिपाली देशपांडे आणि सुप्रिया गव्हाणे यांनी आयोजनात सहाय्य केले.
‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या गीताने मैफलीची सुरुवात झाली. ‘विसरू नको श्रीरामा मला’, ‘थकले रे नंदलाला’, ‘एक धागा सुखाचा’, ‘बाई मी विकत घेतला’, ‘ह्रदयी प्रीत जागते’, ‘हसले आधी कुणी’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘सूर तेच छेड़िता’, ‘सांग कधी कळणार तुला’, ‘एकवार पंखावरुनी’, ‘तुला पाहते रे’, ‘या सुखांनो या’ ही चित्रपट गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. अमृता ठाकूरदेसाई, विशाल गंड्रतवार, अभय इंगळे यांनी समर्पक साथ केली. गायक आणि वादकांना रसिकांची मिळालेली भरभरून दाद हे सुद्धा या मैफलीचे एक वैशिष्ट्य.
व्हायोलिनवर सारंगीचे सूर ऐकल्यानंतर मिळालेली शाबासकी अन् देव कुटुंबियांकडे असलेली गुणग्राहकता याची आठवण रमाकांत परांजपे यांनी जागविली. सुंदर चेहऱ्याची, मराठमोळी आणि आपल्या गुणांनी मन जिंकून घेणारी अशी सीमा माझी मैत्रीण होती असे सुलभा तेरणीकर म्हणाल्या. मराठी चित्रपटातील कलाकारांना मानधन कमी मिळत असले तरी सीमा आणि रमेश देव या लक्ष्मी-नारायणाच्या जोडीला रसिकांचे उदंड प्रेम मात्र मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
सीमा आणि रमेश देव यांचा साखरपुडा पूना गेस्ट हाऊसमध्ये झाल्याची आठवण किशोर सरपोतदार यांनी आवर्जून सांगितली. स्वत: जीवनाचा आनंद घेत रसिकांच्या आयुष्यातही सीमा देव यांनी आनंद पेरला असे भावोद्गार विनया देसाई यांनी काढले. रमेश देव आणि सीमा देव हे स्वयंभू कलाकार असले तरी त्यांनी एकमेकांचा सन्मान केल्याचे त्या म्हणाल्या. कलाकार आणि रसिकांमधील ‘स्नेह’ भरलेली मैफल कायम स्मरणात राहिल हे निश्चित.












