पुणे : पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित कार्यक्रमात राग मल्हारमधील गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रम सोमवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे दिली.
वर्षा ऋतूतील राग मल्हार आणि त्याचे काही प्रकार यावर आधारित हिंदी व मराठी गाणी सादर केली जाणार आहेत. प्राजक्ता सावरकर–शिंदे, सावनी सावरकर, तेजस्विनी नाईक, प्रणव तडवळकर आणि धनंजय पवार गीते सादर करणार असून अरविंद काडगांवकर (तबला), नरेंद्र चिपळूणकर (संवादिनी), वासुदेव बापट (ढोलक–तालवाद्य), अद्वैत कुलकर्णी (सिंथ) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता नादमुद्रा ग्रुपचे उदय नानिवडेकर यांची आहे. कार्यक्रमाचे निवेदन रेखा दैठणकर करणार आहेत. या कार्यक्रमात निसर्गकवी ना. धों. महानोर यांना पाऊसगाण्यांद्वारे स्वरश्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












