देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार चारशे पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. शिराळ्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आता पुन्हा सत्ता आल्यावर ते घटना बदलू शकतात. त्यामुळे सर्वांनी मविआला मदत करण्याची गरज आहे. मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत. या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. देश मोदींच्या हातात गेला आहे.
महागाईवरून मोदी सरकारचे वाभाडे काढताना शरद पवार म्हणाले, २०१४ मध्ये सत्तेतवर आले तेव्हा पेट्रोलचे दर कमी करू असे म्हटले होते. त्यावेळी ७१ रुपये असणारा दर आता शंभर रुपयांच्या वर गेला आहे. सिलेंडरचे दर कमी करू म्हटले, पण ते ही दर कमी झाले नाहीत.
मोदींवर घणाघात करताना शरद पवार पुढे म्हणाले, दिल्लीचा मुख्यमंत्री चांगले काम करून देखील आज तुरुंगात आहे. दिल्लीचा चेहरा केजरीवाल यांनी बदलला. त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती? आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहोत का? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थितांना विचारला.
या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ही निवडणूक आपण जिंकू शकतो.
सत्यजित पाटील विजयी होतील हा विश्वास लोक देत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र आपली ताकद लावत आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले, मोदींमुळे नव्हे तर पवारांमुळेच एफआरपी वाढली आहे. शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांसोबत एक फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामुळे दरवर्षी एफआरपी वाढत आहे. भाजपने शेती उत्पादनाबाबत अडचणी आणल्या आणि कमी म्हणून शेती अवजारावर कर लावला.