राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सर्वात मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, काँग्रेस आणि आमची विचारधारा एकच आहे, असे पवार यांनी म्हटले होते. तसेच प्रथमच शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाचे कौतुक देखील केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते धुळ्यातील शिरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवारांना असे म्हणायचे असेल की, त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल.
शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले, कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेब त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.
दरम्यान, काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेले संजय निरुपम यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, बारामती हातून निसटण्याची भीती पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी विलिनीकरणाचे सूतोवाच केले. काँग्रेसने अनेकदा हा प्रस्ताव दिला आहे. मात्र यात सुप्रिया सुळेंचा तिढा होता. प्रदेश काँग्रेसची धुरा सुप्रिया सुळेंकडे द्यावी असे त्यांचे म्हणणे होते. पण काँग्रेसने हा प्रस्ताव झिडकारला. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पवारांकडे पर्याय नाही. त्यांच्या मुलीचे राजकीय कौशल्य बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी अपुरे आहे, असे निरुपम म्हणाले.