खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा अजित पवार यांच्यात बारामती लोकसभा नीवडणुकीचा सामना रंगला आहे. या निवडणुकीत शरद पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी एक वक्तव्य केले होते, यावरून अजित पवार गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. याबाबत आज पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांचे डोळे पानवले. त्यांनी प्रतिक्रिया देणेही टाळले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी म्हटले होते की, तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात. नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिले. यावेळी सुनेला निवडून द्या. जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवार गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारले असता, त्यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
काय म्हणाले होते अजित पवार…
अजित पवार म्हणाले होते, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल त्या ठिकाणी मतदान करायचं, म्हणजे तुम्हाला पवारांनाच मतदान केल्याचं समाधान मिळेल.