पुणे| प्रतिनिधी
पुणे, दि.१४ : शहरातील नद्यांचे संवर्धन करण्यासाठी नदी सुरक्षा दलाची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. नदीकाठच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच नद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नदी संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थाचीही मदत घेण्यात येईल, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे नदी संवर्धन या विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बंसल, अनिल राऊत, उप अभियंता योगेश अल्हाट तसेच सिटिझन फोरमचे तुषार शिंदे, इन्होवेशन ऍन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशनचे संजय लकडे, जलदिंडीचे राजीव भावसार, सुर्यकांत मुथियान तसेच विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आयुक्त सिंह यावेळी म्हणाले, नदी संवर्धनासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ड्रेनेज किंवा नाल्यांमधून नदीमध्ये दूषित किंवा मैलामिश्रीत पाणी जाऊ नये यासाठी सर्वेक्षण सुरू असून या सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लॅस्टीक, दूषित पाणी जाऊ नये यासाठी नाल्यांवर मॅकेनिकल स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले असून नवीन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उगमापासून ते संगमापर्यंत पाहणी करण्यात येत आहे. पण यासाठी नागरिकांमध्येही जनजागृती होणे गरजेचे असून सामाजिक संस्था तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मदत घेऊन त्यांच्याद्वारे जनजागृती करून नदी संवर्धनास मदत होऊ शकते.
नदीपात्रात कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचे किंवा त्या परिसराचे छायाचित्र काढून स्मार्ट सारथी ऍपमधील ‘पोस्ट अ वेस्ट’ या सुविधेच्या आधारे विद्यार्थी महापालिकेशी संपर्क साधू शकतात. माहिती मिळताच महापालिकेच्या वतीने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल तसेच नदीकाठी पडलेला राडारोडा किंवा कचरा उचलण्यात येईल. पथनाट्य, पदयात्रा यांद्वारे नदीकाठच्या नागरिकांमध्ये जनजागृती करून विद्यार्थी, शिक्षक नदी संवर्धनासाठी महापालिकेस तसेच सामाजिक संस्थांना सहकार्य करू शकतात, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
या बैठकीच्या वेळी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नदी संवर्धनासाठीच्या आपल्या प्रतिक्रिया आयुक्तांसमोर मांडल्या.












