मांजरी: एका १४ वर्षाच्या मुलाने वर्गात जाऊन १५ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधाने झालेल्या वादाचा रागातुन हा प्रकार घडला आहे. हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरी येथील सुभद्रा नर्सरी भोसले पब्लिक स्कुलमधील इयत्ता ९ वीच्या वर्गात मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही एकाच वर्गात शिकतात तसेच दोघेही अल्पवयीन आहेत. वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधातून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरुन १४ वर्षाच्या मुलगा हातात काचेचा तुकडा घेऊन वर्गात शिरला व त्याने ९ वी अ च्या वर्गात बसलेल्या मुलाच्या पाठीमागून येऊन त्याच्या गळ्यावर वार केला. ती काच त्याच्या गळ्याच्या उजव्या बाजुवर घुसवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १५ वर्षाच्या मुलाला गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. त्याने आरोपीला विरोध केला असता त्याने मी तुझी विकेट पाडेन असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी भेट दिली़ आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपस सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे तपास करीत आहेत.