पुणे : तुमच्या सांगण्यावरुन भूमिका बदलली नाही, स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून निधी अडवला असले तर शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा कडक शब्दात महाविकास आघडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर सभेत थेट सुनावलं.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन उरुळी कांचन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देविदास भन्साळी आदी उपस्थित होते.या सभेत डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. बारामती आणि शिरुर मध्ये मोदींच्या विरोधात बोलणारे खासदार होते म्हणून निधी मिळाला नाही, या अजित पवारांच्या विधानाचा खरपूस समाचार डॉ. कोल्हे यांनी घेतला.
डॉ. कोल्हे म्हणाले की, पराभव समोर दिसायला लागल्यावर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस कसा गडबडतो, याच वैषम्य वाटत. हेच गावागावात जाऊन विचारत आहेत, तुमच्या गावात खासदाराने निधी दिला का? पण आज त्यांनीच उत्तर दिलं, की विरोधी पक्षातले खासदार होते म्हणून निधी दिला नाही. त्यामुळे नम्रतापूर्वक इतक्या मोठ्या राष्ट्रीय अध्यक्षांना विचारू इच्छितो, उठता बसता ज्या फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेता, त्या फुल्यांनी कधी म्हटलं होता का, विरोध करता म्हणून तुमच्या मुलीला शाळेत शिकवणार नाही? स्वतःला हाच प्रश्न विचारा विरोधी विचाराचे खासदार आहेत, म्हणून निधी दिला जात नसेल तर याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देत असतील तर फुले-शाहू- आंबेडकर यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला उरतो का? असा सवालही केला.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निधी मिळावा म्हणून सातत्याने पत्र लिहिली, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, ही पत्र त्या लोकांसाठी लिहिली होती, जी अजित दादा आल्यानंतर बेंबीच्या देठापासून एकच वादा म्हटल्यावर ओरडत होती त्यांच्यासाठी लिहिली होती. माझ्या घरची काम नव्हती. आणि केवळ भूमिका बदलली नाही, तुमच्या सांगण्यावरून स्वाभिमान गहाण टाकला नाही, म्हणून शिरुर मतदार संघातील जनतेची काम अडवली असतील, तर हीच जनता तुम्हाला याच उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. फेसबुकच स्टेटस्ट ठेवलं तरी फोन येतात, बघून घेतो, राज्यातल्या सरकारचं किती बारीक लक्ष आहे कार्यकर्त्यांवर. पण, लक्ष्यात ठेवा तुम्ही भूमिका बदलली तेव्हाच तुम्ही सगळे अधिकार गमावलेत. गरीब असलो तरी झुकणार नाही, माझा स्वाभिमान विकणार नाही, या शब्दात ठणकावून सांगितलं.
प्रचारासाठी यायला वेळ, पण छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी यायला वेळ नाही
आपल्या भाषणा डॉ. कोल्हे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. डॉ. कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी पुण्यात येता येत, पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या दहा वर्षात एकदाही येता आलं नाही. हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कदापी विसरणार नाही.
बापावर जायचं नसत
काही महिन्यांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांनी काय केलं, याबाबत केलेल्या विधानाचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रत्येक घरात एक बाप राबत असतो, त्याने काय केलं हा प्रश्न जोपर्यंत विचारला जात नाही, तोपर्यत त्याच महत्व कळत नाही, एकच उत्तर देता, आमच्या जिरायती जमिनी बागायती या बापाने केल्यात. आम्ही जे कळकटलेले कपडे घालून फिरतो होतो, तेच आज स्टार्चचे कपडे घालून फिरतोय ते आज या बापाने आखलेल्या धोरणांमुळे फिरतोय. आमची संस्कृती आहे, काहीही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसत. ज्यांना प्रश्न पडला असेल, अमोल कोल्हे लढायला कसा तयार झाला, तर त्याच उत्तर एकच सांगतो, बापाच्या मांडीवर जाऊन बसल्यावर पैलवान असू किंवा काटकुळ पोरग असू ते बी लढायला तयार होत, म्हणून बापावर जायचं नसत. या शब्दात ठणकावलं.