परळी/प्रतिनिधी
चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना दि .१० रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली.
परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे, जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात. या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अनोळखी चार जण चहा पिण्यासाठी आले होते. त्यांनी हॉटेल मधील कामाला असणाऱ्या एका वेटरकडे सिगारेटचे पाकीट मागितले.
हे पाकीट महाग का दिले म्हणून संबंधितांनी हुज्जत घातली. बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणी पर्यत गेले. यापैकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला. अशी माहिती उपस्थितांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून वेटरने हॉटेलचे शटर लावून घेतले, त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
शुल्लक कारणावरून परळीत गोळीबार !












