चाकण – जिल्ह्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात टोमॅटोला प्रतिकिलोला पाच ते आठ रुपये बाजारभाव मिळत आहे. आवक वाढली असून मागणी कमी असल्याने टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरत झाली आहे.
गेल्या वर्षी प्रतिकिलोला ८० ते १०० रुपयांवर गेलेला बाजारभाव आता आता पाच ते आठ रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची तसेच विक्रीअभावी फेकून देण्याची वेळ आली आहे.
महात्मा फुले बाजारात टोमॅटो स्थानिक परिसरातून तसेच नगर, नाशिक, लातूर जिल्ह्यातून विक्रीसाठी येत आहे. सुमारे तीस टनावर टोमॅटोची मोठी आवक होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना शेतीपिकाला कसेबसे पाणी देऊन शेतकरी शेतीमाल पिकवतो आहे. त्यात बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यात उत्पादन खर्चही अधिक असतो.
यासाठी होतो अधिक खर्च…
- मशागत
- शेणखत
- रासायनिक खते टाकणे
- बेड वाफे तयार करणे
- मल्चिंग पेपर
- औषधांची फवारणी
- रोपांची दोरीने बांधणी
- उन्हापासून संरक्षणासाठी कापडी आच्छादन
टोमॅटो पिकाला एकरी साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च येतो. टोमॅटो तोडणीसाठीच्या मजुरीचा खर्चही दिवसेंदिवस वाढतो आहे. यामुळे शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतीमालास सरकारने हमी भाव द्यायला हवा.
– मुचकुंद जाधव, शेतकरी, भोसे (ता. खेड)
चाकणला मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होते आहे. परंतु बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. टोमॅटो हे पीक शेतकऱ्यांना कधी मालामाल तर कधी उद्ध्वस्त करणारे बेभरवशाचे पीक झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळणे गरजेचे आहे. सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
– कैलास लिंभोरे, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती
टोमॅटोचे बाजारभाव ऐन उन्हाळ्यात घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सरकारचे ही याकडे लक्ष नाही.
– विक्रम शिंदे, शेतकरी चाकण (ता. खेड)