काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये पोहोचली झाली आहे. या यात्रेची सांगता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार आहे.
परंतु, त्याआधी आज (ता. 14 मार्च) चांदवडमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. नाशिकमधील कांदा उत्पादकांच्या मुद्द्यावरून या शेतकरी मेळाव्यात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर या सरकारला शेती आणि शेतकरी यांच्याविषयी कोणतीच आस्था किंवा प्रेम नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
चांदवडमधील शेतकरी मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, जे शेतकरी मेहनतीने शेती कर अन्न पिकवत आहेत, त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कारण देशात आणि राज्यात ज्या लोकांची सत्ता आहे, त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याबाबत जरा सुद्धा आस्था नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील एक प्रसंग सांगत म्हटले की, मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये काम करत असताना माझी चांदवडमध्ये सभा होती. पण सभेला आल्यानंतर कळले की, दिल्लीत कांद्याच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. त्यावेळी मी थेट दिल्लीला गेलो. तेव्हा आज जे सत्तेत होते, ते विरोधात होते.
त्यामुळे ते सर्व कांद्याच्या माळा घालून संसदेत आले. कांद्याचे भाव वाढले आहेत, आम्हाला जगणे कठीण झाले आहे, अशा घोषणा त्यांनी केल्या. त्यावेळी मी त्यांना उत्तर देत सांगितले की, कांदा हा अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे पीक आहे. वर्षातून एकदाच येणारे पीक आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्यानंतर त्याला रास्त किंमत द्यायलाच हवी आहे. त्यावेळी त्यांना मी स्पष्ट सांगितले की, तुम्ही कांद्याच्या माळा घाला, नाहीतर कवड्याच्या माळा घाला. कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळत आहेत, तर मी कांद्याची निर्यात बंद करणार नाही. पण आज देशात याउलट स्थिती आहे, असे शरद पवारांकडून सांगण्यात आले.