पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१६ : नाशिक जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन या पिकांसाठी शासनाने एक रुपयांमध्ये पिकविमा योजना आणली होती त्याचा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. खरिपाच्या पेरणीनंतर जवळपास सव्वा ते दीड महिना पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील मका आणि सोयाबीन ही पिके पूर्णपणे जळी पडली आहे.
अनेकांनी सोयाबीन पिकावर रोटावेटर मारला तर मका जनावरांना खाऊ घातली. मका, सोयाबीन पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला हजारो-लाखो रुपयांचा खर्च वाया गेलेला आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या तुरळक पावसाने या पिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही कारण हा पाऊस खूप उशिराने पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकविम्याचा परतावा मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.
पिकविमा कंपन्या विमा परतावा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. विमा कंपन्यांच्या अटी-शर्ती लागू करण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकपेरा लागलेला असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांनी काही तांत्रिक कारणामुळे पीकपेरा लावलेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲप्सच्या माध्यमातून पीकपेरा लावला आहे मात्र त्याचा इफेक्ट अथवा परिणाम या ॲप्सच्या आणि संपूर्ण यंत्रणेच्या तांत्रिक दोषामुळे सातबारा उताऱ्यावर दिसून येत नाही त्यामुळे पीकपेरा लावून देखील त्यांना फायदा झालेला नाही.
अशा सर्व परिस्थितींसाठी कृषीतज्ञ तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ तसेच प्रशासकीय उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांना निवेदने दिली तसेच या समस्येविषयी त्यांनी सविस्तर चर्चा देखील केली. काँग्रेस नेते सचिन होळकर यांच्या निवेदनानुसार ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 100% पीकविमा परतावा देण्यात यावा यासाठी सातबारा वरील नोंद अथवा ई-पिक पाहणीची अट रद्द केली पाहिजे.
जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याने शेतकऱ्यांना विमा परतावा देऊन किमान त्यांना तात्काळ आधार देण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळेस सचिन होळकर यांच्याशी याविषयी सकारात्मक चर्चा केली आणि लवकरच याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. शासनाने पिकविमा परतावा सरसकट न दिल्यास त्याविरुद्ध आंदोलन करण्याचे तसेच ग्राहक मंचामध्ये केसेस दाखल करण्याचे काम करण्यात येईल असे मत काँग्रेस नेते, कृषीतज्ञ सचिन होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.












