पिंपरी – शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका संगणक अभियंत्याची २९ लाख ६३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ८ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत मारुंजी येथे घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पराग प्रफुल लोहगावकर (वय ३५, सध्या रा. मारुंजी, ता. मुळशी मुळ रा. भगवान नगर, ता.जि. अमरावती) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 447480611104 क्रमांक धारक, ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 नावाचा व्हॉटसअप ग्रुप, IND SES नावाचे ॲप यांच्या विरोधात भा.दं.वी. कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर 447480611104 या मोबाईल धारकाने मेसेज केला. त्यांना ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 या व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉईन होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना IND SES नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वीस संपादन करुन ट्रेडिंग करुन त्याद्वारे जास्त नफा कमावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून २९ लाख ६३ हजार ५९९९ रुपये घेतले. मात्र, त्यानंतर फिर्यादी यांना कोणताही नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्णन कांदे करीत आहेत.