पुणे : लेखन, दिग्दर्शन, गायन, अभिनय या क्षेत्रात अनुभवसिद्ध असलेल्या सुहास वाळुंजकर लिखित ‘संगीत अतृप्ता‘ तसेच ‘सौदा आणि इतर चार एकांकिका‘ या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वर्किंग वूमन होस्टेल हॉल, गोखले नगर येथे आयोजित करण्यात आला असून उच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि मनोहर पारळकर यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. रोंगटे आणि संजय मेस्त्री प्रमुख पाहुणे आहेत.
यांत्रिकी पार्श्वभूमी असलेले सुहास वाळुंजकर हे टाटा मोटर्समधून निवृत्त झाले आहेत. टाटा मोटर्स कलासागरच्या नाट्य शाखेच्या प्रवासात व यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कलासागरच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक स्पर्धांचे परिक्षण केले. त्यांना सर्वोच्च मानाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार, 2022 प्राप्त झाला आहे.
लेखन, दिग्दर्शन, गायन, अभिनय या क्षेत्रात अनुभवसिद्ध असलेल्या सुहास वाळुंजकर यांनी संस्कृत महाकवींनी लिहिलेली नाटके मराठी रंगभूमीला उपलब्ध व्हावीत म्हणून आजवर महाकवी कालिदासाचे ‘मालविकाग्निमित्रम् ‘, श्रीहर्षाचे ‘रत्नावली‘, शुद्रकाच्या ‘मृच्छकटिकम् ‘ वरुन ‘तेची पुरुष देवाचे‘ आणि महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम् ‘ अशी चार नाटके, संगीत नाटक स्वरुपात सादर केली आहेत.
महाभारतातील अप्रचलित कथेवर आधारित ‘संगीत अतृप्ता‘ हे नाटक आहे. संस्कृतप्रचुर भाषेमुळे नाटकाचा स्तर चांगलाच उंचावला आहे. विश्वामित्र ऋषींचा पुत्र गालव आणि ययाती राजांची कन्या माधवी यांची ही रोमहर्षक कथा आहे. वेद-पुराण काळापासून स्त्रियांवर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची पार्श्वभूमी या नाटकाला लाभली आहे. नाटकाची नायिका माधवी स्त्री वर्गाचे प्रतिनिधीत्व करते. विचार करायला लावणारे कथासूत्र आपल्या समर्थ लेखणीतून सुहास वाळुंजकर यांनी समाजापुढे मांडले आहे.












