पुणे : संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशनतर्फे पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन दि. 18 व दि. 19 नोव्हेंबर 2023 रोजी आळंदी येथे आयोजित करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संत चोखामेळा व परिवारातील संतांच्या अभंगांचे संशोधक, चरित्रलेखक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मंगळवेढा) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संमेलनाच्या अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थांची बैठक संत तुकाराम अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्ष प्राचार्या उल्का धावारे–चंदनशिव्ो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम – संत ज्ञानेश्वर – संत नामदेव अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. ओम श्रीश दत्तोपासक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संत चोखामेळा महाराज व परिवारातील संतांच्या साहित्याचा प्रचार–प्रसार करण्यासाठी संमेलन घेण्याविषयी चर्चा होऊन पुण्यभूमी आळंदी येथे पहिले संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले.
दोन दिवसीय साहित्य संमेलन सहा सत्रांत होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांची उपस्थिती असणार आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, संत साहित्य प्रदर्शन, उद्बोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. तसेच ‘संत चोखामेळा व सोयराबाई यांच्या साहित्यातील श्रीविठ्ठलभक्ती‘ असा मध्यवर्ती आशय घेऊन विशेषांकही प्रकाशित करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी संत चोखामेळा यांच्या दुर्मिळ अभंगांचे संपादन केले असून या साहित्याचा प्रदीर्घ अभ्यास केला आहे.
या प्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, प्रा. डॉ. ओम श्रीश दत्तोपासक, प्राचार्य डॉ आप्पासाहेब पुजारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. माणिकराव सोनवणे, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य ॲड. प्रणव पाटील, कवयित्री अलका सपकाळ, वृंदावन फाऊंडेशन समन्वयक वल्लभ केनवडेकर, प्रा. विनोद सूर्यवंशी, संमेलन समितीचे निमंत्रक प्रा. सोमनाथ लांडगे आदी उपस्थित होते.












