पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : जेव्हा स्त्रीला उच्चशिक्षणाची,रोजगाराची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर होईल असे प्रतिपादन डॉ. क्रांती जमाले – नलावडे यांनी केले आहे.
दैनिक राज्य लोकतंत्र आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या.
आज या व्याख्यान सत्राच्या सहाव्या दिवशी पिंपरी चिंचवड बार कोर्ट रूम, नेहरूनगर येथे दुपारी 2 वाजता डॉ. क्रांती जमाले – नलावडे ( स्त्री – रोग तज्ञ ) यांच्या स्त्रियांचे आजार आणि समस्या या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अल्पना रायते या होत्या.
या कार्यक्रमास कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. अल्पना रायते,पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, ॲड. शीतल चौधरी, ॲड. भाग्यश्री भोईर, ॲड. जयश्री गोरे, ॲड. पौर्णिमा मोहिते, ॲड. सविता तोडकर, ॲड. संगीता कुशलकर, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. नीलम जाधव, ॲड. सारिका जॉन, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. मानसी उदासी, ॲड. वैशाली जाधव, ॲड. पूजा बदे, ॲड. पूनम शर्मा,ॲड. तारा नायर आदी वकील भगिनी उपस्थित होत्या.
करियर आणि कुटुंब यांच्याकडे बघता बघता स्त्री ती स्वतः कोण आहे हेच विसरून जाते. ती स्वतःला सगळ्यात शेवटी प्राधान्य देते. आपल्या शारीरिक आरोग्या बरोबरच मानसिक आणि सामाजिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे.स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने नाही तर पुढे चालायला हवं असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, महिलांनी आरोग्यासाठी वेळ काढत प्राधान्य दिले पाहिजे. आता सगळ्यांची जीवनशैली बदलली आहे. घड्याळाच्या काट्यावर सगळ्यांना पळावं लागत. याचा मनावर जो ताण निर्माण होतो तो सुद्धा मॅनेज करता यायला हवा.
स्वतःला वेळ मिळत नसेल तर काम करत करत १५ मिनिटांचा फिटनेस ब्रेक घेऊ शकतो. मुलांना देखील मुलींचा आदर करायला सांगितले पाहिजे.मासिक पाळीतील समस्या, वयाशी संबंधित समस्या अशा अनेक समस्येविषयी त्या बोलत होत्या.
सगळ्या वकील भगिनींनी त्यांच्या आजारा संबंधित असणाऱ्या समस्या मांडल्या. त्यावेळी – डॉ. क्रांती जमाले – नलावडे यांनी त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. अल्पना रायते यांनी केले. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे यांनी आभार मानले.तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. क्रांती जमाले – नलावडे ( स्त्री – रोग तज्ञ ) यांना पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले.












