बालपणापासून संस्कृत पाठांतर आणि पठण सुरु ठेवल्यास उतार वयात अल्झायमर डिमेशिया सारखे आजार दूर ठेवता येऊ शकतात असा सल्ला डॉक्टर अनिल जयवंत यांनी दिला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एन्. ई. एम्. एस्. शाळेत शालेय विद्यार्थांचे आरोग्य या विषयावर पालकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पूर्व प्राथमिक ते दहावीच्या पालकांना संबोधित करतांना डॉक्टर जयवंत यांनी विद्यार्थांच्या आरोग्यासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
मेंदु शरिरातील महत्वाचा अवयव असून त्याला ऑक्सिजन आणि पाणी योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मैदानावरील खेळ, चेंडू हवेत झेलणे, सागरगोटे खेळणे, संस्कृत पाठांतर आणि पठण या सारख्या गोष्टीमुळे मेंदूला चालना मिळते. यामुळे उतार वयात अल्झायमर डिमेशियासारखे आजार दूर राहू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.
उदर भरण हे यज्ञ कर्मासारखे पवित्र मानून शरिराला आवश्यक आहे तेवढेच अन्न खाल्ल्यास लहान आणि मोठ्यांमधील लठ्ठपणा टाळता येऊ शकतो असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
घरापासून समाजापर्यंत मुलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होते हे डॉक्टर अनिल जयवंत यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. तसेच पालकांना मुलांच्या आरोग्याबद्दल जागरुक रहाण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी आणि मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख, शिक्षक – शिक्षिका पालक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षिका ज्योती कुरकेली यांनी केले.
संस्कृत पाठांतर करा, अल्झायमर डिमेशियासारखे आजार टाळा, वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला












