पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : पाईप लाईनची दुरुस्ती करणाऱ्या कामगारावर तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या व हातातील तलवार आणि लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या सनी ऊर्फ मृणाल शेवाळे टोळी प्रमुखा सह इतर दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ६६ मोक्का कारवाई आहे.
सनी ऊर्फ मृणाल मोहन शेवाळे (वय २६ रा. उरळी देवाची), प्रसाद बापूसाहेब भाडळे (वय २३ रा. उरळी देवाची), समीर बाबुलाल जमादार (वय २३ रा. मंतरवाडी, उरळी देवाची) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उरळी देवाची गावात दि. २६ ऑगस्ट रोजी स्मशानभूमी जवळ ओढ्याच्या बाजूला दुपारी एकच्या सुमारास पाईप लाईन दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी सनी ऊर्फ मृणाल शेवाळे याने फिर्यादी यांना तलवारीचा धाक दाखवून दुरुस्तीचे काम सुरु ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच टोळीतील प्रसाद भाडळे याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
सनी शेवाळे यांने ५० हजार रुपये दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी यांना दिली. तर हतातील तलवार हवेत फिरवून “आम्ही इथले भाई आहोत कुणी मध्ये आले तर जिवंत सोडणार नाही” असे बोलून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम ३८६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म अक्ट, क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सनी उर्फ मृणाल शेवाळे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केले आहेत. मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान करणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशत पसरली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१)(ii), ३(२), ३(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखालीवरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे,सहा. पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, सर्वेलन्स अंमलदार संदीप धनवटे, तेज भोसले, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ यांच्या पथकाने केली.












