पुणे प्रतिनिधी:
दि.२१ पुणे शहर आणि जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांसह खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेश देऊ नका, अन्यथा संबंधित प्रशासनावरच कारवाई केली जाईल,’ असा इशारा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिला आहे. शहरी भागासह जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी अशा १७७७ आस्थापनांना ‘आरटीओ’ने नोटीस बजावली आहे.
त्यामुळे सर्व आस्थापनांना आता हेल्मेटच्या नियमांची अंलबजावणी करणे अनिवार्य असणार आहे. पुणे आरटीओकडून पुणे शहर व जिल्ह्यातील सरकारी कार्यालय, कर्मचाऱ्यांसी संख्या जास्त असलेल्या कंपन्या, एमआयडीसीतील कंपन्या, वेगवेगळी कॉलेज अशा १७७७ आस्थापनांना हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नका, अशा नोटीसा बजावल्या आहेत.
वाहन कायदा कलम १९४ ड नुसार विना हेल्मेट वाहन चालविणे आणि चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित केली आहे. आपल्या कार्यालयाच्या आतमध्ये त्यांनी विनाहेल्मेट प्रवेश देऊ नये. अन्यथा संबंधित आस्थापनेला जबाबदार धरून त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, अशी नोटीस ‘आरटीओ’ने दिली आहे.












