पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नरेंद्र मोदी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी पात्र असून, दोन्ही योजनेचे सुमारे १९४३.४६ कोटी रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. खरीप, रब्बी हंगामात पेरणी, मशागत, खते आणि शेतमजुरांना मजुरी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा निधी ऐन उन्हाळ्यात मिळत आहे.
राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी यवतमाळ येथील कार्यक्रमात वितरीत होणार आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून चार हजार, असे एकूण सहा हजार रुपयांचा लाभ राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे.