पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २५ दुचाकी जप्त करुन २५ गुन्हे उघडकीस आले आहेत. संतोष शिवराम घारे (वय – ४२ रा. मु.पो. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे) असे अटक केलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठी बाजार पेठ असल्याने याठिकाणी वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चोरीचे गुन्हे रोखण्याकरीता व दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावर भेट देवुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉल डिडेल तपासले असता रेकॉर्ड वरील सराईत दुचाकी चोर संतोष घारे हा दुचाकी चोरी करीत असल्याचे उघड झाले.
आरोपी संतोष घारे हा फिरस्ता असून तो पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात स्वत:चे वेगवेगळी नावे सांगुन पोलिसांपासून स्वत:ची ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार मयुर भोसले आणि आशिष खरात यांनी आरोपीचा आळंदी, पुणे स्टेशन, देहु, चाकण, पिंपरी येथे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांनी सात दिवस आरोपीचा शोध घेऊन आरोपीला पुणे स्टेशन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून यापुर्वी वेळोवेळी विश्रामबाग पोलीस ठाणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरलेल्या २५ दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी आरोपीकडून विश्रामबाग, डेक्कन, शिवाजीनगर, शिरगाव पंधरवडी, तळेगाव दाभाडे, देहुरोड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेष कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे, सहायक पोलीस फौजदार राकेश गुजर,पोलीस अंमलदार रेवण कंचे अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, हेमंत पालांडे, महावीर वलटे, आशिष खरात,अर्जुन थोरात, ताताप्पा पाटील, नितीन बाबर, राहुल मोरे, संतोष शेरखाने, अर्जुन कुडाळकर यांच्या पथकाने केली.