ज्यांचे स्थान देशातील राजकारणात अत्यंत महत्वाचे मानले जाते, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातील सर्वात मोठे वक्तव्य केले आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का, याबाबत पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमच्या विचारणीत फरक नाही. पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवार देशातील राजकारणात कशासाठी ही पावले टाकत आहेत, याबाबत सध्या चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटले की, लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही.
या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
तसेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत शरद पवार म्हणाले,
उद्धव ठाकरे एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत.
त्यांची विचारसरणी मी पाहिली आहे. ती आमच्यासारखीच आहे.
समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक आहे.
परिस्थिती १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापेक्षा जास्त पाठिंबा राहुल गांधी यांना आहे, असे पवार म्हणाले.












