पुणे प्रतिनिधी
दि.२८: यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या व्यवस्थापनास मदत होण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबरलाही शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.
आज दि.२८ अनंत चतुर्दशी त्यानंतर आता शुक्रवार २९ रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्यात आली, त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्ट्यांचे आहेत. रविवारनंतर सोमवारी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे नागरिकांना आता सलग पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
हिंदु आणि मुस्लिम समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी राज्यात शांततेचं वातावरण रहावं तसेच पोलिसांना मिरवणुकांचं नियोजन करण्यासाठी शक्य व्हावं, त्यासाठी २९ सप्टेंबर रोजी सूट्टी जाहीर करण्याची विनंती ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.












