मुंबई : काल (दि.१४ रोजी) पहाटे सिने अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन हल्लेखोरांनी ३ राऊंड फायर केले आणि ते पळून गेले. मुंबई पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. या घटनेला सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याला जबाबदार धरले आहे. हे गृहखात्याचे अपयश असल्याचे त्या म्हणाल्या.
या घटनेबाबत एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचे काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो. हे खूप सुशिक्षित ठिकाण आहे, जिथे लोक शांततेत राहतात. पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे. मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि.१४ रोजी) पहाटे ५ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. ३ राऊंड फायरिंग करण्यात आले. घटनेनंतर क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर झाली. आरोपींना ओळखण्यासाठी आम्ही परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, असे पोलीस म्हणाले.
घडलेल्या घटनेचे धागेदोरे कॅनडापर्यंत; अनमोल बिश्नोई याने या घटनेची जबाबदारी
दरम्यान, आरोपींनी वापरलेल्या दुचाकीची माहिती पोलिसांनी काढली आहे. ती जुनी दुचाकी आरोपींनी रायगड जिल्ह्यातून खरेदी केली होती. ती दुचाकी त्यांनी गोळीबाराचा गुन्हा करण्यासाठी वापरली असल्याने पोलिसांनी दुचाकी खरेदी विक्री प्रकरणातील लोकांची चौकशी सुरु केली आहे.
या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने स्वीकारली असल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. त्याचाही मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पाठपुरावा केला असता त्या पोस्टचा आयपी ॲड्रेस कॅनडा येथील असल्याचे समोर आले आहे. मात्र हा आयपी ॲड्रेस कॅनडा येथील दाखवत असले तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाल्याची शक्यता लक्षात घेत पोलीस तपास करीत आहेत.
रविवारी मुंबई पोलिसांनी अनेक पथके दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना केली आहेत. एका आरोपीची ओळख पटविण्यात आली आहे. विशाल राहुल उर्फ कालू याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशाल याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो हरियाणा मधील गुरुग्रामचा रहिवासी आहे.
सन १९९८ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान खान याने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या समाजातून येतो त्या समाजात कळविटांना देवाचा दर्जा आहे. त्यामुळे बिष्णोई टोळीकडून सलमान खानला धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सलमानला धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. आता सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे.