पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.गणेश सुरेश गायकवाड ( अधीक्षक कार्यालय,ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे ) असे आरोपीचे नाव असून पीडित महिलेने त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिला या शासकीय सेवक असून दि. २१ जुलै रोजी त्यांची एक लाख सात हजार रुपयांची वैद्यकीय देयक फाईल मंजुरीसाठी वैद्यकीय आवक – जावक विभाग, अधीक्षक कार्यालय,ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे येथे सादर करण्यात आली होती.त्या फाईलची पडताळणी आरोपी हे करत होते.
सादर करण्यात आलेल्या फाईल मध्ये चुका न काढता फाईल पूर्ण करून देण्यासाठी आरोपी यांनी पीडित महिले कडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पण तडजोड करून दोन हजार पाचशे रुपये लाच स्वरूपात स्वीकारण्याचे त्यांनी कबूल केले.
याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची शहानिशा केली असता आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींवर भादवी कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण ह्या करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.नि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.












