पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : “दादा, मला जेवायला पैसे नको. पण, बाळाच्या औषधासाठी पैसे हवे आहेत. माझ्या हातातही पैसे देऊ नका. ते औषधवाल्याला द्या. काहीतरी मदत करा,” अशा शब्दांत एक आई आपल्या बाळाच्या औषधासाठी आर्थिक मदत मागत असल्याचे विदारक चित्र ससून रुग्णालयात बुधवारी रात्री नऊ वाजता दिसले.
ससून रुग्णालय प्रशासनाने ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ची मोहीम राबविली. या अंतर्गत रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला औषध देण्यात येत आहे. सुरूवातीला या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा औषधांच्या चिठ्या रुग्णांच्या हातात ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी एक आई आपल्या बाळाला बरे वाटावे यासाठी आर्थिक मदत मागत फिरत होती.
हे चित्र कोणत्याही संवेदनशिल मनाला विषण्ण करणारे होते.
याबाबत माहिती देताना प्रमोद माने म्हणाले, “एक महिला चिठ्ठी घेऊन औषधासाठी मदत मागत होती. तिच्या हातात ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे होती. ही औषधे बघितल्यानंतर ती नियमित औषधे असल्याचे जाणवले. त्याची किंमतही फारशी नव्हती. पण, ती रक्कमही तिच्याकडे नसल्याचे चौकशी केल्यानंतर समजले.”
झिरो प्रिस्क्रिप्शन मोहीम
ससून रुग्णालयात ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ मोहीम राबविल्याने एका डॉक्टरांनी रुग्णाच्या हातात औषधाची चिठ्ठी द्यायची नाही, असा फतवा प्रशासनाने काढला. औषधाची चिठ्ठी लिहून देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याचीही घटना घडली. त्यामुळे ससून रुग्णालय आणि परिसरातील दुकानांमध्ये औषध घेण्यासाठी दिसणारी गर्दी कमी झाली. सगळी औषधे रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहेत, असा दावा रुग्णालयातर्फे करण्यात येत होता. पण, गेल्या काही महिन्यांपासून परत औषधांच्या चिठ्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातात टेकवल्या जात आहेत. त्यातून परिसरातील दुकानांमधील औषधविक्री ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
स्थानिक पातळीवर खरेदी
सरकारने राज्य पातळीवर खरेदी केलेल्या औषधांचा पुरवठा ससून रुग्णालयास केला जातो. तसेच, काही औषधे स्थानिक पातळीवरूनही गरजेप्रमाणे खरेदी केली जातात. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवरील औषध खरेदी वाढली आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ती पारदर्शक पद्धतीने होत नाही. ठराविक औषध विक्रेत्यांकडूनच ही खरेदी होते, असा आरोपही करण्यात आला. मात्र, हा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला आहे. पारदर्शक पद्धतीने औषध खरेदी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशी वाढल्या औषधाच्या चिठ्या
ससून रुग्णालयाच्या परिसरात जूनमध्ये १० टक्के रुग्ण औषधांच्या चिठ्ठया घेऊन येत होते. जुलै-ऑगस्टपासून हे प्रमाण काही अंशी वाढू लागले आहे. गेल्या महिन्यामध्ये हे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदविले.












