पुणे प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालयाबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नवीन परिपत्रकानुसार ग्रंथालयात विद्यार्थी आणि संशोधकांना लॅपटॉप वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लॅपटॉप चार्जिंग करण्यात ग्रंथालयात मनाई करण्यात आली आहे. यामुळे, विद्यार्थी आणि संशोधकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
बुधवारी जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालकांनी नवे मार्गदर्शक तत्वे जारी केली. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार, अनाधिकृतपणे वाचनकक्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात येईल. दंडाची रक्कम प्रथम वेळेस ५० रुपये, व्दितीय वेळेस १०० रुपये आणि तृतीय वेळेस १५० रुपये इतकी असेल.
तसेच यापुढे सदर अनाधिकृत सदस्यास विद्यापीठात कोठेही प्रवेश वा अन्य सुविधा नाकारण्यात येईल. वाचनकक्ष हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. तेथे मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल. वाचनकक्षात लॅपटॉप वापरण्यास परवानगी आहे, परंतू चार्जिंग करण्यास मनाई आहे, असे आदेश लागू करण्यात आले आहेत.












