पुणे | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या मेसमधील जेवणाच्या ताटात आळी, प्लास्टिक इ. गोष्टी सापडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुलींच्या वसतिगृहामधील मेसमधील जेवणात एक झुरळ आढळून आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सातत्याने विद्यापीठांमधील मेस चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
या मुजोर मेस चालकांवरती विद्यापीठ प्रशासनाचा कसल्याही पद्धतीचा धाक राहिलेला नाही. जर या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणि एखाद्याच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार कोण ? या घटनेला सर्वस्वी मेसचालक व विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार आहेत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने भोजनगृह समितीची मागणी करण्यात आली आहे.परंतु अजूनपर्यंत या समितीची नेमणूक करण्यात आली नाही.

विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ या मेसचालकांवरती कठोर कारवाई करावी व त्याचे टेंडर रद्द करून नवीन चालकास मेस चालवण्यासाठी द्यावे. अन्यथा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटना तसेच विद्यापीठातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन तीव्र धरणे आंदोलन करू असा इशारा विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला आहे.
“आज मेसच्या पोह्यांमध्ये झुरळ निघालं मागे एकदा roll मध्ये केस निघालेला, आणि हे असं नेहमीच होतं मुली बोलायला घाबरतात,त्यामुळे या सगळ्याच प्रमाण वाढतच चाललंय, आणि मेसमधील रोजच्या जेवणाची quality सुद्धा खाण्यायोग्य नाही. बऱ्याच मुलींनी या जेवणाला कंटाळून बाहेरचे डबे लावले आहेत, पण प्रत्येकाला ते परवडत नाही आणि एका state मध्ये विद्यार्थ्यांना चांगले जेवण न मिळणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे मेसचे contract बदलले गेले पाहिजे. आणि मेसच्या जेवणावर नियंत्रण राहावे यासाठी एक student committee तयार करण्यात यावी. आणि मुलींना 2 मेसचा option उपलब्ध करून द्यावा जेणेकरून मुलींना चांगले जेवण मिळेल”
विद्यार्थिनी ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ )












