पुणे : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही. झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले. ते हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उद्ध्वस्त करणार आहेत. त्यामुळे हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू, असे आव्हान शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात करताना शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात त्यावर चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते. देशाची घटना बदलण्यासाठी ४०० पार च्या घोषणा दिल्या जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आमची आहे. आतापर्यंत सर्व सहकार्यांनी मनापासून साथ दिली. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढलो. यंदाची निवडणूक वेगळी आहे. देश कसा चालवायचा हे यंदाच्या निवडणूकीचे उद्दिष्ट आहे, असे पवार म्हणाले.