पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेला लागून असलेल्या जागेत रविवारच्या रात्री पावणे अकरा वाजता एक ब्लास्ट झाला. त्यानंतर एकामागोमाग एक असे तब्बल नऊ स्फोट झाले होते. या स्फोटांनी पिंपरी चिंचवड शहर अक्षरशः हादरून गेले होते.
दरम्यान घटनास्थळी मंत्री तानाजी सावंत यांनी भेट देत गॅस माफियांचा हौदोस ससून मधल्या ड्रग माफियांसारखाच असल्याचे वक्तव्य करत पिंपरी चिंचवड पोलिसांना चांगलेच खडसावले. तसेच पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटांनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत.
याप्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ताथवडे येथे टँकर मधून गॅस चोरी करताना सिलेंडरचा स्फोट घडला होता. याप्रकरणात दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह सहा पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. वाकड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर व रावेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेज शिकीलगार असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.
या प्रकरणाबाबत कायदेशीर व कडक कारवाई करत वाकड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आज (दि. १०) घटनास्थळी जाऊन इतर संशयित लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणले असल्याची माहिती वरिष्ठांनी दिली आहे.
पुणे- बंगलोर महामार्गावर रविवारी रात्री अवैध रित्या गॅस टँकरमधून गॅस भरत असताना नऊ सिलेंडरचे स्फोट होवून अग्नितांडव झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या कार्य शैलीवर प्रश्न उपस्थित केला जात होता. आता पोलिसांना निलंबित केले असले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस चोरी झाल्याचे समोर आल्याने पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले आहे.
प्रतिक्रिया :
सिलिंडर स्फोटप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन आरोपी अटक केले आहेत. तसेच पोलिस उपायुक्तांना सखोल चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. दोन अधिकारी व चार अंमलदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड












