पुणे: माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आणि परकीय चलन वापरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री (दि.१९) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुप्रिया सुळे बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा आरोप एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत त्यांनी केला.
या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाल्या, ” माझ्यावर असे आरोप करण्यात आल्याचे काल संध्याकाळी मला कळाले. माझ्या हातात ते व्हॉईस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी सर्वात आधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला.
काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहे आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची असल्याचे मी त्यांना सांगितले. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेस खोटे आणि बनावट आहेत”, असे सुळे म्हणाल्या.
दरम्यान याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले आहे. “तो अधिकारी एकेकाळी जेलमध्ये होता, जो अधिकारी जेलमध्ये होता त्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही. भाजप आणि अजित पवार यांचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होत आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.